बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी; नंदुरबार पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार : बनावट सातबारा उतारा व इतर कागदपत्रे सादर करून नंदुरबार नगरपरिषदेकडून बांधकाम परवानगी मिळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार नगरपरिषदेतील नगररचनाकार महेश वामनराव पवार यांनी याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकाश प्रवीण चौधरी, कमल रामचंद्र ठाकरे, गोविंद मनुमल गुजराणी आणि पप्पू भिका ठाकूर यांच्यासह संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.

बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी बनावट सातबारा उतारा तसेच इतर कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या कागदपत्रांच्या आधारे नगरपरिषद प्रशासनाची दिशाभूल करून परवानगी मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात सन १९९८ मधील नंदुरबार तहसील कार्यालयातील संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यापासून ती नगरपरिषदेकडे सादर करण्यापर्यंत नेमकी कोणाची भूमिका होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणामुळे नगरपरिषदेकडे सादर होणाऱ्या मालमत्ता व बांधकामाशी संबंधित कागदपत्रांच्या पडताळणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250