सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन; मोलगी पोलिसांकडून जनजागृती

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोलगी पोलिसांच्या वतीने जनजागृती बैठक घेण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक निवृत्ती पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला मोलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४१ पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, विविध पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन; मोलगी पोलिसांकडून जनजागृती
cyber-fasavnukipasun-savadh-raha-molgi-polisan-kadun-janajagruti

बैठकीत सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम अथवा डेबिट-क्रेडिट कार्डचे तपशील आणि पासवर्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नयेत, तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे, असे पोलिसांनी सांगितले.

गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत सायबर फसवणुकीबाबतची माहिती पोहोचावी, यासाठी प्रत्येक पोलीस पाटलाने गावातील दर्शनी ठिकाणी जनजागृतीपर बॅनर लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच गावात कोणत्याही अनोळखी इसमाचा वावर आढळल्यास त्याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

सायबर फसवणुकीला बळी पडल्यास वेळ न दवडता सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. तातडीने तक्रार नोंदवल्यास फसवणुकीची रक्कम परत मिळविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक संभाजी भामरे, मोलगीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज पटले, अशोक राऊत, वसुधरा वसावे, इंद्राबाई पाडवी, सी.के. पाडवी, विजय पाडवी, तुजला पाडवी, दिशा वळवी, बबिता वसावे, निर्मला वसावे आदी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250