आदिवासी युवक-युवतींच्या रोजगारासाठी शासन कटिबद्ध; पेसा आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आदिवासी समाजातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधींना गती देणे, पेसा क्षेत्रातील आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर कालबद्ध आणि सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत सांगितले.
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, आदिवासी युवक-युवतींना त्यांच्या हक्काचा न्याय मिळावा, पेसा क्षेत्रातील आरक्षणाची प्रभावी आणि कायदेशीर अंमलबजावणी व्हावी तसेच सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक, कालबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित विभागांना निश्चित कालमर्यादेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मागणीची सकारात्मक दखल घेऊन त्यावर नियमानुसार आणि प्राधान्याने निर्णय घेण्यात येईल.
या बैठकीस खासदार हेमंत सावरा, आमदार राजू तोडसाम, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

