दुर्गम भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा विशेष उपक्रम
‘कुपोषणमुक्त भारत’ हे ध्येय समोर ठेवून अंगणवाडी केंद्र, शाळा आणि समुदाय स्तरावर बहुआयामी उपक्रम हाती घेण्यात आले असुन या अभियानाचा एक भाग म्हणून, वित्तीय वर्ष २०२५–२६ मध्ये अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील ९ अंगणवाडी केंद्रांचा कायापालट करण्यात आला. अंगणवाड्यांचे नूतनीकरण करून लहान मुलांसाठी अधिक सुरक्षित, प्रसन्न आणि शैक्षणिकदृष्ट्या पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
या यशस्वी उपक्रमाची व्याप्ती वाढवत, वित्तीय वर्ष २०२६–२७ मध्ये आणखी २० ते २५ अंगणवाडी केंद्रांचे नूतनीकरण करण्याचे नियोजन आहे.
नूतनीकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये:
• बालस्नेही वातावरण: रंगीबेरंगी आणि आकर्षक चित्रांद्वारे बालकांसाठी आनंददायी शिक्षण आणि संगोपनाची सोय.
• सुरक्षितता आणि स्वच्छता: पिण्याच्या पाण्याचा आणि स्वच्छतेच्या सुविधांचा विस्तार.
• पोषण आणि आरोग्य सेवा: नियमित आरोग्य तपासणी आणि सकस आहाराच्या वितरणासाठी सक्षम पायाभूत सुविधा.
स्थानिक प्रशासन आणि महिला व बाल विकास विभागाच्या सक्रिय सहकार्यामुळे दुर्गम भागातील बालकांसाठी प्रारंभिक बालसंगोपन, शिक्षण आणि पोषण सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होत आहे.

