५३% पाऊस गायब, डोळ्यांसमोर पिके करपली! नंदुरबार जिल्हा तात्काळ ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करा; युवा क्रांती सामाजिक संघटनेची प्रशासनाकडे आक्रस्ताळी मागणी
(नंदुरबार) वार्षिक मोसमी पावसाने फिरवलेली पाठ आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला हवालदील शेतकरी... ही आज नंदुरबार जिल्ह्यातील भीषण वास्तवता बनली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मुसळधार बरसणारा पाऊस यंदा अवघा नावालाच पडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाण्याचे आणि शेतीचे भयंकर संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा आणि सर्वाधिक फटका बसलेले तालुके तात्काळ 'दुष्काळग्रस्त' म्हणून घोषित करण्यात यावेत, या मागणीसाठी युवा क्रांती सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना परिस्थितीचे गांभीर्य दर्शवणारे निवदेन सुपूर्द केले आहे.
नाशिक विभागात सर्वाधिक ५३ टक्के पर्जन्यतूट
नंदुरबार जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या मोसमी काळात एरवी सरासरी ७२८ मिलीमीटर पाऊस नोंदवला जातो. मात्र, यंदा अवघा ३४० ते ३५० मिलीमीटर पाऊस पडला असून, जिल्ह्यात तब्बल ५३ टक्के पर्जन्यतूट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण नाशिक विभागाचा विचार करता पावसाची सर्वाधिक तूट नंदुरबार जिल्ह्यातच नोंदवली गेली आहे.
अक्राणी आणि तळोदा तालुक्यांत पाण्याचा टंचाईचा हाहाकार
जिल्ह्यातील अक्राणी (धडगाव) आणि तळोदा या अतिदुर्गम व आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये परिस्थिती सर्वांत बिकट आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये मोसमी पावसाच्या सरासरीच्या अवघा एकतृतीयांश (1/3rd) पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक नद्या-नाले कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर असून, येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचा आणि गुरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण होणार आहे.
हाताशी आलेली खरीप पिके जळाली
पावसाच्या दीर्घ ताणामुळे जिल्ह्यातील शेती पुरती कोलमडली आहे. शेतात उभी असलेली कापूस, सोयाबीन, भात, मका आणि बाजरी यांसारखी मुख्य खरीप पिके पाण्याचा थेंब न मिळाल्याने वाळून गेली आहेत. पिकांची वाढ पूर्णपणे खुंटल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला आहे. या संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी शासनाने कोणताही विलंब न करता नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून मदत कार्य सुरू करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
विज्ञापित
Follow Us:

