सरकारी दप्तराचे फेरे विसरा! आता थेट तुमच्या दारी मिळणार २२ हून अधिक शासकीय सेवा; नंदुरबार जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियानाचा’ धडाका!
(नंदुरबार) शासकीय कामांसाठी सरकारी कार्यालयांचे खेटे मारणे, दाखले व प्रमाणपत्रांसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आणि तासन् तास रांगेत उभे राहणे... हा सामान्य नागरिकांचा रोजचा मनस्ताप आता कायमचा संपणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासन थेट पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे.
विज्ञापित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील यशस्वी कारकीर्दीस २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या निर्देशानुसार हे महाअभियान राबवले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या अभियानाची सविस्तर रूपरेषा मांडली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानात मिळणाऱ्या २२ हून अधिक प्रमुख सेवा:
- महसूल व शेतीविषयक: प्रलंबित फेरफार नोंदींचा त्वरित निपटारा, ७/१२ व ८-अ उतारे अद्ययावत करणे, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, आणि ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते’ योजना.
- दाखले व प्रमाणपत्रे: नॉन-क्रीमीलेअर, अधिवास प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी दाखले, दिव्यांग प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आणि शिकाऊ वाहनचालक परवाना (Learner’s License).
- ओळख व अन्नसुरक्षा: नवीन शिधापत्रिका (Ration Card) वितरण, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती.
- वनहक्क व सामाजिक न्याय: प्रलंबित वनहक्क दाव्यांची मंजुरी आणि इतर प्रलंबित शासकीय प्रकरणांचा निपटारा.
‘सेवा माझे योगदान’: लोकसहभागातून बदलणार गावांचे रूप!
केवळ दाखले वाटपापुरते मर्यादित न राहता, या अभियानाला ‘जनआंदोलनाचे’ स्वरूप देण्यासाठी ‘सेवा माझे योगदान’ हा विशेष उपक्रम राबवला जात आहे.
- आरोग्य व रक्तदान: प्रत्येक गावात आणि शहरी प्रभागांमध्ये भव्य रक्तदान शिबिरे व मोफत आरोग्य तपासणी.
- पर्यावरण संवर्धन: ‘एक पेड माँ के नाम’ व सामूहिक वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती मोहीम आणि स्थानिक जलस्रोतांची स्वच्छता.
‘सेवा ज्योत यात्रा’ आणि तरुणाईचा जल्लोष
नव्या पिढीमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व ‘विकसित भारत-२०४७’ ची संकल्पना रुजवण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन केले आहे:
- शालेय स्पर्धा: ‘विकसित भारत’ विषयावर चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, तसेच अंगणवाडी उत्सव.
- सांस्कृतिक जनजागृती: ‘नमो सेवागाथा’ नाटकांच्या व सांस्कृतिक पथकांच्या माध्यमातून गावोगावी प्रबोधन.
- सेवा ज्योत यात्रा व बाईक रॅली: ‘विकसित भारत-सेवा ज्योत यात्रा’ आणि भव्य बाईक रॅलीद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार.
जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या थेट अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती या संपूर्ण अभियानाचे सूक्ष्म नियोजन व संनियंत्रण करत आहे.
“नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पात्र नागरिकाने, शेतकरी बांधवांनी, महिलांनी व तरुणांनी १७ ऑक्टोबरपर्यंत आयोजित होणाऱ्या या शिबिरांचा आणि उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे भावुक आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत शेवटी केले.
विज्ञापित
Follow Us:

