सेवा संकल्प अभियानातून लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ, खेडदिगर मंडळात विशेष शिबिर संपन्न, तहसीलदार संभाजी पाटील यांच्या हस्ते लाभाचे वाटप

नंदुरबार:-शासनाच्या विविध योजना व शासकीय सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत खेडदिगर मंडळ, ता. शहादा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरास सरपंच गणेश बागुल, सरपंच नवनाथ वाघ, मंडळ अधिकारी ब्राह्मणपुरी, ग्रामसेवक अरुण गवळी तसेच ब्राह्मणपुरी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व कोतवाल यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानातून लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ, खेडदिगर मंडळात विशेष शिबिर संपन्न, तहसीलदार संभाजी पाटील यांच्या हस्ते लाभाचे वाटप
seva-sankalp-abhiyan-camp-kheddigar-tehsildar-sambhaji-patil

तहसीलदार संभाजी पाटील यांनी ‘जिवंत सातबारा’ मोहिमेबाबत माहिती देताना या मोहिमेला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून, त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना झाल्याचे सांगितले. नागरिकांनी आपल्या जमिनीशी संबंधित नोंदी व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार संभाजी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते योजनांचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सरपंच गणेश बागुल यांनी मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. आवश्यक कागदपत्रे अद्ययावत करून पात्रतेनुसार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पुरवठा विभागाच्या वतीने रेशनकार्डधारक व पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले.
या उपक्रमासाठी सर्व रेशन दुकानदार तथा स्वस्त धान्य दुकानदारांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरात नागरिकांच्या महसूल व पुरवठा विभागाशी संबंधित विविध अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महसूल, पुरवठा, संजय गांधी निराधार योजना तसेच इतर विभागांच्या विविध योजना व सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अशा शिबिरांमुळे नागरिकांना एकाच ठिकाणी माहिती, मार्गदर्शन आणि पात्रतेनुसार प्रत्यक्ष लाभ मिळण्यास मोठी मदत होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्ष्मण कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिरीषचंद्र परदेशी, सुभाष माळी, राजू शिंदे व देवा यांनी सहकार्य केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: