सेवा संकल्प अभियानातून लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ
नंदुरबार : शासनाच्या विविध योजना व सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत खेडदिगर मंडळ, ता. शहादा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तहसीलदार संभाजी पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
तहसीलदार संभाजी पाटील यांनी ‘जिवंत सातबारा’ मोहिमेची माहिती देत नागरिकांनी जमीनविषयक नोंदी व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
शिबिरात महसूल, पुरवठा, संजय गांधी निराधार योजना यांसह विविध विभागांच्या योजनांची माहिती, मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही करण्यात आली. नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सरपंच गणेश बागुल, सरपंच नवनाथ वाघ, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक अरुण गवळी, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल, रेशन दुकानदार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना व सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
Follow Us:

