‘सेवा संकल्प अभियान-2026’चा उत्साहात शुभारंभ!
जिल्हाधिकारी मा. डॉ.मित्ताली सेठी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘सेवा चित्ररथा’ला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
‘सेवा चित्ररथ’ महिनाभर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पेसा गावांमध्ये फिरणार असून, आदिवासी समाजासाठीच्या विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहे. तसेच आरोग्य, बालविवाह प्रतिबंध व व्यसनमुक्ती याबाबतही व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, आयुष्मान कार्ड व अंत्योदय कार्ड यांसह आवश्यक कागदपत्रे व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पारधी समाजासाठी विशेष शिबिरे, वनपट्टेधारक लाभार्थ्यांना 7E व 12E वाटप, तसेच 5 ऑक्टोबर रोजी वीरांगना राणी दुर्गावती जयंतीनिमित्त आदिवासी महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. महिला बचत गटांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यात येणार आहे.
शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ‘माझी शाळा, माझी सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता, वृक्षारोपण व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे.
प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना व सेवा पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी नियोजन, समन्वय व संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मा. डॉ.मित्ताली सेठी यांनी केले.

