राजापूर तालुक्यातील दोनीवडे – गवळी वाडीतील कविस्कर कुटुंबियांच्या गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा आजही अखंडीत सुरु

राजापूर:-तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या दोनीवडे -गवळीवाडी येथे कविस्कर कुटुंबीय गेल्या शंभर वर्षांपासून वास्तव्यास आहेत.
राजापूर तालुक्यातील दोनीवडे – गवळी वाडीतील कविस्कर कुटुंबियांच्या गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा आजही अखंडीत सुरु
rajapur-100-years-ganeshotsav-tradition

कुटुंबाने सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा आजही अखंडपणे सुरू असून, संस्थापक तुळाजी लक्ष्मण कविस्कर यांनी सुरू केलेल्या या उत्सवाची धुरा आता त्यांच्या चौथ्या पिढीतील तरुण पिढी उत्साहाने सांभाळत आहे.
कविस्कर कुटुंबातील गणेशोत्सवाची लगबग साधारणपणे दहीहंडी सणानंतरच सुरू होते. चौथ्या पिढीतील तरुण मुले उत्साहाने सजावटीच्या तयारीला लागतात. दरवर्षी नवीन संकल्पना, आकर्षक सजावट आणि कल्पकतेचा सुरेख मिलाफ या उत्सवात पाहायला मिळतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दिवसांत कविस्कर कुटुंबाचा घरगुती गणेशोत्सव हा परिसरातील आकर्षणाचा विषय ठरतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजन करून बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर दररोज सकाळी आणि रात्री पूजा-अर्चा व आरती केली जाते. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या धार्मिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.

विज्ञापित

भक्तिभावाने भारलेले वातावरण संपूर्ण घरात अनुभवायला मिळते. दररोज बाप्पांसाठी विविध प्रकारचे नैवेद्य तयार करण्याची जबाबदारी घरातील महिला वर्ग मोठ्या प्रेमाने आणि मनापासून पार पाडतो. पारंपरिक पदार्थांसोबतच विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य बाप्पांना दाखविला जातो. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा आनंदसोहळा ठरतो. गौरी पूजनाच्या दिवशी तर उत्साहाला विशेष उधाण आलेले असते. गौरींचे आगमन, पूजन आणि पारंपरिक विधींमुळे घरातील वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भरून जाते. कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या दिवसाचा आनंद स्पष्टपणे दिसून येतो. मात्र गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बाप्पांच्या विसर्जनाची वेळ जवळ आली की आनंदाच्या वातावरणावर विरहाची छाया पसरते. लाडक्या बाप्पांना निरोप देताना कुटुंबातील प्रत्येकाचे मन भावूक होते. डोळ्यांत पाणी आणि ओठांवर पुढील वर्षी लवकर या, असा भाव घेऊन गणरायाला निरोप दिला जातो.
शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेली ही गणेशोत्सवाची परंपरा आज चौथ्या पिढीनेही तितक्याच श्रद्धेने, उत्साहाने आणि आपुलकीने जपली आहे. बदलत्या काळातही संस्कृती, परंपरा आणि कुटुंबातील एकजूट जपणारा हा गणेशोत्सव निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: