उद्योगमंत्री उदय सामंत गुरुवारी नंदुरबार दौऱ्यावर; शिवसेनेच्या मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

नंदुरबार : राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात शिवसेनेच्या वतीने संघटनात्मक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत गुरुवारी नंदुरबार दौऱ्यावर; शिवसेनेच्या मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
udy-samant-nandurbar-visit-shiv-sena-meet-padadhikari-workers-dialogue

मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या या मेळाव्यात जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच पक्षाची आगामी दिशा, संघटन अधिक मजबूत करण्यासाठीच्या उपाययोजना आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.

या मेळाव्यास जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मंत्री सामंत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून, पक्ष संघटनात्मक पातळीवरही बैठका आणि नियोजनाला वेग आला आहे.

दरम्यान, मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेनेचे आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. आमश्या पाडवी, शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी आ. शिरीष चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. राम रघुवंशी, ज्येष्ठ नेते विजयंसिंह पराडके आणि जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी पुढाकार घेतला आहे.

मंत्री उदय सामंत यांच्या नंदुरबार दौऱ्याकडे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून, त्यांच्या मार्गदर्शनातून आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250