गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवा : पोलीस अधीक्षक अश्विनी सानप

अक्कलकुवा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी प्रशासन आणि पोलीस विभागाशी समन्वय ठेवून सण-उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडावा. तसेच प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवा : पोलीस अधीक्षक अश्विनी सानप
ganeshotsav-shantit-par-padavnyasathi-prashasanashi-samanvay-theva-ashwini-sanap

अक्कलकुवा येथे आगामी गणेशोत्सव व सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह आ. आमश्या पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष महाले, तहसीलदार विनायक धुमरे, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, गटविकास अधिकारी विजय अहिरे, सरपंच उपसरपंच यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत गणेशोत्सव काळात पार्श्वभूमीवर मिरवणुकीचा मार्ग, वाहतूक व्यवस्था, ध्वनिक्षेपकाचा नियमबद्ध वापर, तारापासून सुरक्षितता, गणेशमूर्ती विसर्जनावेळी घ्यावयाची खबरदारी, गर्दीचे नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे फोटो, व्हिडिओ अथवा मजकूर प्रसारित करू नये, असा इशाराही पोलिसांनी दिला.

कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. अनुचित घटना घडल्यास पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

चोरीला गेलेले १८ मोबाईल नागरिकांना परत

बैठकीदरम्यान पोलिसांनी नागरिकांना दिलासा देणारी कामगिरीही केली. गेल्या काही काळात चोरीला गेलेले सुमारे ३ लाख रुपये किमतीचे १८ मोबाईल फोन सायबर व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून शोधून काढण्यात आले. हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याचे समाधान असल्याचे नागरिकांनी सांगितले. मोबाईल परत मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष प्रयत्न केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250