वासदरे येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग; उत्पादनाच्या अचूक नोंदी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
(नंदुरबार) खरीप हंगामातील पिकांची स्थिती व उत्पादनाचा अचूक अंदाज घेण्यासाठी प्रशासनामार्फत पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहेत.
याअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी नंदुरबार तालुक्यातील मौजा वासदरे येथे शेताच्या बांधावर उपस्थित राहून सोयाबीन पीक कापणी प्रयोगाची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सोयाबीनची कापणी व मळणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. पीक कापणी प्रयोगातून मिळणारी आकडेवारी नुकसानभरपाई व पीक विम्यासाठी महत्त्वाची असल्याने उत्पादनाच्या नोंदी अचूक, पारदर्शक व त्रुटीविरहित ठेवण्याच्या सूचना त्यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती व अडचणी जाणून घेतल्या. शासनाच्या विविध योजना व नुकसानभरपाईचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल,श्री. पंकज पटले,सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार संतोष डेरे, तालुका कृषी अधिकारी कुणाल ठाकुर यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्तरीय पीक कापणी प्रयोग समितीचे सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते.
Follow Us:

