विलेपार्लेतील पितळे वाडीतील रोहित तोस्कर यांनी साकारला जुनी शाळा ते नव्या पार्ले टिळक शाळेचा देखावा
या सजावटीमध्ये आमच्या जुन्या मराठी माध्यमाच्या शाळेची वास्तू, तिच्याशी जोडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि काळानुसार उभी राहिलेली नवी इंग्रजी माध्यमाची ICSE शाळा यांचा सुंदर मिलाफ दाखवण्यात आला आहे. या संकल्पनेमागील मुख्य प्रयोजन म्हणजे बदल हा काळाची गरज असला, तरी आपल्या जुन्या आठवणी, संस्कृती आणि मुळं विसरता कामा नयेत, हा संदेश देणे. ज्या शाळेने अनेक पिढ्यांना घडवलं, तिच्या आठवणी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात आणि जुन्या-नव्या पिढीमध्ये एक भावनिक नातं निर्माण व्हावं, हा या सजावटीमागचा उद्देश आहे. आमच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा गेल्या 54 वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी गणपती बाप्पाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक किंवा भावनिक संदेश देणारी वेगळी संकल्पना साकारण्याचा आमचा प्रयत्न असतो. असे तोस्कर यांनी सांगितले.

