बालहुतात्म्यांना स्मृतिदिनी अभिवादन; देशाई आदर्श मराठी विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांची रॅली
मुख्याध्यापिका मिनाक्षी भदाणे यांच्या हस्ते शिरीषकुमार मेहता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हरिश्चंद्र चौधरी, लालदास शहा, धनसुखलाल वाणी, घनश्यामदास शहा तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नंदुरबारच्या बालहुतात्म्यांच्या शौर्याची, त्यागाची आणि देशासाठी दिलेल्या अमूल्य बलिदानाची माहिती देण्यात आली. वंदना देवरे यांनी देशासाठी लढलेल्या अमर हुतात्म्यांच्या कार्याची माहिती सांगितली. माधुरी पवार यांनी ‘भारत माता की जय’, ‘भारतीय स्वातंत्र्य अमर रहे’, ‘नंदुरबारचे शहीद अमर रहे’, ‘बाल क्रांतिकारक अमर रहे’ अशा देशभक्तिपर घोषणांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली.
यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची हुतात्मा स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी गुजराती विभागाचे मुख्याध्यापक भद्रे शुकुमार त्रिवेदी, विद्यार्थी प्रतिनिधी गौरवकुमार तसेच शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज वानखेडे, सतीश पाटील, हरिश्चंद्र चौधरी, शीतल अजबे, श्रुती शिंदे, कल्याणी भदाणे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

