कुपोषित बालकांची टीबी तपासणी अधिक प्रभावी होणार; प्रतिबंधात्मक उपचारांसह डिजिटल नोंदणीवर भर

मुंबई : कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना तातडीने योग्य उपचार मिळावेत, यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (NRC) टीबी तपासणीची कार्यपद्धती अधिक सक्षम करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल टीबीचे निदान, उपचार आणि प्रतिबंध यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
कुपोषित बालकांची टीबी तपासणी अधिक प्रभावी होणार; प्रतिबंधात्मक उपचारांसह डिजिटल नोंदणीवर भर
kuposhit-balakanchi-tibi-tapasani-prabhavi-pratibandhatmak-upchar-digital-nondani

पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक बालकाची टीबीसंदर्भातील लक्षणे, आजाराचा इतिहास तसेच संभाव्य संपर्क याची तपासणी केली जात आहे. संशयित प्रकरणांमध्ये आवश्यकतेनुसार नमुना संकलन, सीबी-नॅट/ट्रूनॅट तपासणी आणि छातीचा एक्स-रे यांसारख्या निदान सुविधांशी बालकांना जोडले जात आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, निदान सुविधा आणि औषधांचा पुरवठा यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे.

२०२१ ते जुलै २०२६ या कालावधीत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल झालेल्या २९ हजार ८७५ बालकांपैकी २६ हजार ८५७ बालकांची टीबी तपासणी करण्यात आली आहे. तपासणीचे हे प्रमाण सुमारे ८९.९ टक्के आहे. तर २०२६ मध्ये जुलैपर्यंत दाखल झालेल्या ३ हजार १७ बालकांपैकी २ हजार ८३५ बालकांची तपासणी करण्यात आली असून, याचे प्रमाण तब्बल ९४ टक्के आहे.

तपासणीचे प्रमाण वाढत असतानाच निदान झालेल्या टीबी रुग्णांची संख्या कमी होत असल्याचेही आकडेवारीतून दिसून येते. २०२२ मध्ये २३ बालकांवर उपचार सुरू करण्यात आले होते. ही संख्या २०२५ मध्ये ७, तर जुलै २०२६ पर्यंत ३ बालकांपर्यंत आली आहे. संपर्क तपासणी आणि निक्षय पोर्टलवरील नोंदींच्या आधारे या स्थितीचे सातत्याने परीक्षण केले जात आहे.

लक्षणे नसलेल्या संपर्कातील बालकांवरही लक्ष

टीबी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मात्र सध्या लक्षणे नसलेल्या बालकांना टीबी प्रतिबंधात्मक उपचार (TPT) देण्यासाठी घरगुती तसेच पोषण पुनर्वसन केंद्रांतील संपर्क तपासणी अधिक बळकट केली जात आहे. त्यामुळे आजाराची लागण होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येणार आहेत.

जटिल, औषध-प्रतिरोधक तसेच निदानास आव्हानात्मक बाल टीबीच्या प्रकरणांसाठी बाल टीबी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. यामुळे गंभीर प्रकरणांचे तज्ज्ञांकडून निदान व उपचार करणे अधिक सुलभ होणार आहे.

‘निक्षय’शी जोडली जाणार माहिती

पोषण पुनर्वसन केंद्रांमधील टीबी तपासणी आणि निदानाची माहिती ‘निक्षय’ पोर्टलशी जोडण्याचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांची नोंदणी, उपचारांचा मागोवा आणि उपचारांच्या परिणामांचे परीक्षण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. टीबीचे निदान झालेल्या बालकांना निक्षय पोषण योजना आणि संबंधित उपक्रमांतर्गत पोषण सहाय्याशीही जोडले जात आहे.

जास्त रुग्णसंख्या असलेल्या पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ट्रूनॅट/सीबी-नॅट यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा विस्तार, संपर्क तपासणी, क्षयरोगावरील प्रशिक्षण आणि पालकांचे समुपदेशन यावरही भर देण्यात येत आहे. यामुळे निदानासाठी लागणारा वेळ कमी होऊन उपचारांमध्ये खंड पडण्याचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.

सर्व NRC मध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणीचे उद्दिष्ट

राज्यातील सर्व पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये टीबी तपासणीचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक राखणे, उर्वरित बालकांची तपासणी पूर्ण करणे आणि पात्र बालसंपर्कांना प्रतिबंधात्मक उपचार देणे, अशी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम यांच्यातील समन्वय आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

कुपोषणाशी झुंज देणाऱ्या बालकांचे आरोग्य अधिक सुरक्षित करण्यासाठी टीबीचे लवकर निदान, वेळेवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना आता अधिक गती देण्यात येत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250