दहीहंडी उत्सवातून ‘नशामुक्त महाराष्ट्र’चा संदेश; युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे – मुख्यमंत्री फडणवीस
या उत्सवभेटीदरम्यान त्यांनी मुंबईतील विविध ठिकाणी युवकांना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी’ उत्सवात प्रतिकात्मक दहीहंडी फोडून शुभारंभ करण्यात आला. ‘नशामुक्त महाराष्ट्र’ मोहिमेचा संदेश देणारे बॅनर यावेळी प्रदर्शित करण्यात आले. वरळी येथे जांबोरी मैदानावरील परिवर्तन फाउंडेशन आयोजित ‘दहीहंडी’ उत्सव प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा चौकातील मानाच्या दहीहंडी उत्सवातही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. गोविंदा पथकांतील तरुणांचा उत्साह, जिद्द आणि शिस्तीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
दहीहंडी हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राची परंपरा, तरुणाईचे साहस, आणि संघभावनेचा जागर आहे. दहीहंडीतील मानवी मनोरे हे संघटित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते. दहीहंडी उत्सवातून युवकांना संघभावना, नेतृत्व, परिश्रम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. दहीहंडीच्या थरारात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राम कदम, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

