विज्ञापित

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानासह आर्थिक पाठबळ देणारी योजना

(नंदुरबार) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही पारंपरिक कारागिरांच्या हाताला काम आणि त्यांच्या कामाला सन्मान देणारी योजना आहे. कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास तसेच आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानासह आर्थिक पाठबळ देणारी योजना
pradhanmantri-vishwakarma-yojana-paramparik-karagiranna-adhunik-tantradnyanasah-arthik-pathbal

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात आज सेवा संकल्प अभियानातंर्गत पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा तसेच सन्मान सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप काकडे, एसबीआयचे महाव्यवस्थापक सुहास कोतकर, जिल्हा अग्रणी बॅकेचे महाव्यस्थापक नंदनकुमार पैठणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दिनेश पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संदीप बोरसे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर आपल्या कौशल्यातून विविध वस्तू तयार करीत आहेत. त्यांच्या पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 60 हजार 946 कारागिरांनी नोंदणी केली आहे. मागील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने त्यापैकी 3 हजार 537 कारागिरांना विश्वकर्मा ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. तसेच 2 हजार 596 कारागिरांनी कौशल्य पडताळणी पूर्ण केली असून, त्यापैकी 1 हजार 52 कारागिरांना टूलकिटचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 638 लाभार्थ्यांना प्रथम स्तरावरील 1 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी 498 कारागिरांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत करणे एवढा नसून, देशातील पारंपरिक कला व कौशल्य जिवंत ठेवणे आणि तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळविणे हा आहे. कारागिरांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून स्वतःचा उद्योग उभारावा आणि इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी म्हणाल्या की, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी संस्थात्मक यंत्रणा उभारण्यात येईल. लाभार्थ्यांची संख्या, कर्ज वितरण, कर्जाची परतफेड तसेच लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा नियमित आढावा घेण्यासाठी महिन्यातून एकदा आढावा घेण्यात येईल. बँकांनी लाभार्थ्यांच्या कर्जासंदर्भातील प्रकरणास मंजुरी द्यावी. लाभार्थ्यांना कर्ज किंवा योजनेच्या लाभाबाबत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हॉट्सॲपद्वारे नोंदविण्यात यावी. आगामी काळात जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सेठी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अग्रणी बॅकेचे श्री.पैठणकर, स्टेट बॅकेचे महाव्यवस्थाक श्री. कोतकर यांनी यावेळी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सेठी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना टुलकिट वाटप तसेच बॅक कर्ज मंजूरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री पाटील यांनी केले.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: