संशोधन समाजाच्या समस्यांवर उपाय देणारे ठरावे; विज्ञान-नवोन्मेष प्रयोगशाळेबाहेर पोहोचवा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांच्या सन्मानार्थ रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई आणि इंडियन केमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
रसायन तंत्रज्ञान संस्थेने दरवर्षी ‘विज्ञान आणि समाज सप्ताह’ आयोजित करून संशोधन व नवोन्मेष सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावा, तसेच प्रयोगशाळा आणि समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ करावेत, अशी सूचना राज्यपाल वर्मा यांनी केली. विज्ञान क्षेत्रातील महिलांना संशोधन, विद्यापीठ प्रशासन, उद्योजकता आणि उद्योग क्षेत्रात नेतृत्वाच्या अधिक संधी देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे आवाहनही राज्यपालांनी केले.
रसायन तंत्रज्ञान संस्थेने देशाला १८ पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक आणि सुमारे ७,००० प्रथम पिढीतील उद्योजक दिल्याची माहिती डॉ. गणपती यादव यांनी दिली, तर राज्यातील विद्यापीठांनी संशोधक आणि पीएचडी धारकांची संख्या वाढविण्याची गरज प्रा. एम. एम. शर्मा यांनी व्यक्त केली.
यावेळी हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ महिला वैज्ञानिक प्रा. एम. लक्ष्मीकांतम, ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच परिषदेत महिला वैज्ञानिकांच्या योगदानाची विशेष दखल घेत त्यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव पद्मभूषण डॉ. टी. रामासामी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच मोठ्या संख्येने वैज्ञानिक, संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

