मोठ्या मूर्तीपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात पोहोचवा – मुख्यमंत्री फडणवीस
‘पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’ चे आयोजन सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे करण्यात आले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार मंदा म्हात्रे, रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.
मूर्ती मोठी असो वा लहान, भक्ती तेवढीच असते. ईश्वराचा आशीर्वाद मूर्तीच्या आकारावर नव्हे, तर आपण समाजाची आणि पर्यावरणाची किती सेवा करतो यावर अवलंबून असतो. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सवय पुढील पिढीपासूनच रुजविण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या अभिनव कार्यशाळेत मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यशाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मूर्तींचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी स्वतःही गणेशमूर्ती साकारली. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आपल्यासोबत बाप्पाची मूर्ती घडवत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. मंत्री पंकजा मुंडे यांनीही स्वतः गणेशमूर्ती साकारत सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.

