गणेशोत्सवासाठी मोठा निर्णय! मुंबई-गोवा महामार्गावर १६ टनांवरील जड-अवजड वाहनांना विविध टप्प्यांत बंदी

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर विविध टप्प्यांत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवासाठी मोठा निर्णय! मुंबई-गोवा महामार्गावर १६ टनांवरील जड-अवजड वाहनांना विविध टप्प्यांत बंदी
ganeshotsavasathi-motha-nirnay-mumbai-goa-mahamargavar-16-tonanvaril-jad-avjad-vahananna-vividh-tappyant-bandi

गणेशोत्सवपूर्व तयारी व मूर्तींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ पासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ पर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या ट्रक, मल्टीॲक्सल, ट्रेलर, लॉरी आदी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी राहणार आहे.
तसेच पाच दिवसांच्या गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत, सात दिवसांच्या गणपती तसेच गौरी-गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते २० सप्टेंबर रोजी रात्री ११ पर्यंत निर्बंध लागू राहतील. अनंत चतुर्दशीच्या १२ दिवसांच्या गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.
या निर्बंधातून जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, तसेच दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व अन्य नाशवंत व जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने वगळण्यात आली आहेत. पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन तसेच अन्य अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाही हे निर्बंध लागू राहणार नाहीत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील रुंदीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी तसेच संबंधित साहित्य व मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही निर्बंधातून वगळण्यात आले आहे. अशा वाहनांना संबंधित वाहतूक विभाग किंवा महामार्ग पोलिसांकडून प्रवेशपत्र देण्यात येणार आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250