दीक्षान्त समारंभातून आयुष्यभर शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एचएसएनसी विद्यापीठाचा पाचवा दीक्षान्त समारंभ मुंबई विद्यापीठात झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवी तसेच ४५ गुणवंत पदवीधर विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
दीक्षान्त समारंभ हा शिक्षणाचा शेवट नसून आयुष्यभर शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे. देशात चांगले डॉक्टर, अभियंते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आहेत तसेच, चांगले नागरिक आणि चांगले नेतृत्व घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
तंत्रज्ञानाची खरी ताकद केवळ ते काय करू शकते यात नसून, त्याचा वापर आपण किती विवेकाने करतो यात आहे. प्रगतीची व्याख्या केवळ तांत्रिक प्रगतीपुरती मर्यादित न ठेवता त्यामध्ये आरोग्य, नैतिकता, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचाही समावेश असला पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.

