डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी खासदार नरेश म्हस्के, उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.
गेल्या तीन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत योगदान देणाऱ्या डॉ. रेवती श्रीनिवासन यांनी सर्वसामान्य मुलांसोबतच विशेष गरजा असणाऱ्या, ग्रामीण व वंचित घटकांतील मुलांसाठी थेरपी सेंटर्स आणि विशेष उपक्रम राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. लंडनच्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये झालेला त्यांचा सन्मान आणि त्यांनी निर्माण केलेला शैक्षणिक वारसा संपूर्ण ठाणेकरांसाठी अभिमानास्पद आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमादरम्यान धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत, शाळेतील प्रवेश प्रक्रियेसाठी सामान्य कार्यकर्त्यांच्या व पालकांच्या विनंत्या घेऊन प्रत्यक्ष शाळेत येण्याच्या जुन्या प्रसंगांचे स्मरण केले.
यावेळी डॉ. रेवती श्रीनिवासन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, शिक्षणाचा खरा उद्देश केवळ साक्षरता नसून, प्रत्येक बालकाच्या क्षमतेचा शोध घेऊन त्याला समाजात आत्मसन्मानाने जगण्याचे बळ देणे हा आहे.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबतच विशेष गरजा असणारी मुले, ग्रामीण आणि सामाजिक – आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील मुले यांच्यासाठी परिश्रम घेणे आवश्यक आहे. विशेष थेरपी सेंटर्स आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून या मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली पाहिजे.

