जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न; ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व तक्रार निवारणावर भर

या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी तसेच ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य माधव हिरणवाडे, रणजितसिह राजपूत, डॉ. मधुकर देसले, रामभाऊ पाटील, जितेंद्रसिंग राजपूत आदी यावेळी उपस्थित होते.
ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत अधिक माहिती मिळवून देणे, तक्रारींचे वेळेत व प्रभावीपणे निराकरण करणे आणि ग्राहक हिताचे संरक्षण करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी केले.
या बैठकीमध्ये ग्राहक संरक्षणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यात आली. यात प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य उत्पादन शुल्क, पुरवठा विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित ग्राहकांच्या समस्या मांडण्यात आल्या. बैठकीस उपस्थित अशासकीय सदस्यांनी ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण, ग्राहकांच्या हक्कांची जनजागृती आणि ग्राहक हिताच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण मते व सूचना मांडल्या. ग्राहकांच्या समस्या प्रलंबित न ठेवता वेळेत सोडविण्यावर यावेळी भर देण्यात आला.
अनाथ मुला-मुलींना शिक्षण, योग्य संस्कार आणि सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती वंदना रामदास तोरवणे यांना नुकताच राज्यस्तरीय ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्याबद्दल बैठकीत अपर जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

