‘लालपरी’ सुसाट! महामंडळाच्या उत्पन्नात ६६ कोटींची घसघशीत वाढ; तोटा भरून निघणार
मुंबई :महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या 'लालपरी'ने (एसटी बस) यशाची एक नवी आणि सुखावणारी भरारी घेतली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत सरत्या ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जमिनीवर दिसू लागल्याने, एसटीचा तोटा आता झपाट्याने कमी होऊ लागला आहे. आगामी काही महिन्यांत एसटीचा चालू तोटा पूर्णपणे भरून काढण्याच्या दिशेने महामंडळाची सकारात्मक वाटचाल सुरू असल्याचा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

एसटीचे प्रत्येक आगार हे त्या परिसरातील सर्वसामान्य जनतेला हक्काची सेवा देण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. आकडेवारीचा अभ्यास केला असता एक रंजक आणि महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे; ती म्हणजे एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक प्रवासी हे १०० किलोमीटरच्या आतील अंतराचा प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक आगाराने आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक प्रवाशांची नेमकी गरज ओळखून बस फेऱ्यांचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
दुर्दैवाने, गेल्या काही वर्षांत या महत्त्वाच्या बाबीकडे थोडे दुर्लक्ष झाले होते. लांब पल्ल्याच्या, मात्र कमी प्रवासी असलेल्या (अनुत्पादक) फेऱ्यांवर अधिक भर दिला जात होता. परिणामी, प्रवासी संख्या आणि उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊन एसटीला तोट्याचा मोठा फटका सहन करावा लागत होता. मात्र, मागील महिन्यात हा तोटा भरून काढण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी महामंडळाने कंबर कसली आणि त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.
ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक आगाराने प्रवाशांची प्रत्यक्ष उपलब्धता आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आपल्या वेळापत्रकात आवश्यक आणि लवचिक बदल करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील दररोज प्रवास करणारे नोकरदार, कष्टकरी शेतकरी, महिला, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासाच्या वेळा लक्षात घेऊन बस फेऱ्यांचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. त्याबरोबरच स्थानिक पातळीवरील आठवडी बाजार, यात्रा-जत्रा तसेच स्थानिक गर्दीचे दिवस लक्षात घेऊन संबंधित मार्गांवर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजनही करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवाशांची सोय तर झालीच, पण महामंडळाच्या गल्ल्यातही मोठी भर पडली आहे.
Follow Us:

