शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनावर भर : मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून त्यांची गुंतवणूक करण्याची क्षमता कमी आहे. शेतीचा उत्पादन खर्च वाढतो आहे. या तुलनेत हमीभावामुळे शेतकऱ्यांना विशेष लाभ मिळत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी शेती क्षेत्रातील संशोधनाला चालना द्यावी लागेल आणि हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या महाविद्यालयांची आवश्यकता आहे. या महाविद्यालयातील सुविधा लक्षात घेता नाशिकमध्ये भविष्यात होणाऱ्या कृषी संशोधनात हे महाविद्यालय अग्रेसर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवे तंत्रज्ञान, नवीन संशोधन याच्या साह्याने कृषी महाविद्यालयांनी जमिनीचा पोत ओळखून खतांचा वापर करण्याचे मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. राज्यात कृषी महाविद्यालयाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. विविध पिकांकरिता उत्पादकता वाढविण्याचे मॉडेल्स तयार करण्यात येत आहेत. महाविद्यालयातील प्रयोग शेतापर्यंत पोहोचावे, शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेवून शेतीला विविध प्रक्रीया उद्योगाशी जोडल्यास मोठी अर्थव्यवस्था उभी राहील. या माध्यमातून शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला.नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीत या संस्थेचा मोलाचा वाटा असल्याचे कौतुकोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.
