महावितरणच्या शिबिरांत ९६ ग्राहकांचे ‘समाधान’

नंदुरबार : वीज ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ, पारदर्शक आणि प्रभावी निवारण करण्यासाठी महावितरणतर्फे प्रत्येक उपविभागात आयोजित ग्राहक समाधान शिबिरांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विशेष शिबिरांमध्ये वीज ग्राहकांच्या विविध अडचणींचे जागेवरच समाधान करण्यात आले. ९६ तक्रारींचे निवारण करून ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला.
महावितरणच्या शिबिरांत ९६ ग्राहकांचे ‘समाधान’
96-grievances-resolved-mahavitaran

मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार मंडलांतर्गत नंदुरबार व शहादा विभागांतील एकूण ९ उपविभागांमध्ये एकाच दिवशी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वीज ग्राहकांच्या समस्या त्यांच्याच कार्यक्षेत्रात जलदगतीने सुटाव्यात, हा यामागचा मुख्य उद्देश होता. शिबिरामध्ये प्रामुख्याने नवीन वीजजोडणी, वीजबिलांमधील नावात व पत्त्यात बदल, सरासरी व वाढीव वीजबिले, रुफ टॉप सौर योजना तसेच आधुनिक स्मार्ट मीटरशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. या सर्व समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते आणि सर्व संबंधित तांत्रिक कर्मचारी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते.
विशेष म्हणजे प्राप्त तक्रारींवर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली. यात नंदुरबार विभागात ५६ तर शहादा विभागात प्राप्त ४० तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत स्मार्ट मीटरबाबतच्या शंकांचे सविस्तर निरसन केले. अचूक मीटर रीडिंग, दिवसा वीज वापरावर मिळणारी प्रति युनिट ८५ पैसे सवलत, ग्राहकाच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध होणारी रिअल टाईम वीज वापराची नोंद आणि करंट लिकेजची अचूक माहिती यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे स्मार्ट मीटर अत्यंत पारदर्शक व फायदेशीर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. स्मार्ट मीटर बाबत त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करून त्यांना स्मार्ट मीटर व साधे मीटर या दोघांची कार्यपद्धतीतील फरक व दोन्ही मीटर सारखेच रीडिंग रेकॉर्ड करतात हे समजावून सांगण्यात आले. उपस्थित ग्राहकांनी त्यांच्या शंकांचे योग्य पद्धतीने निरसन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राज्य शासनाच्या स्मार्ट सोलर योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील तसेच १०० युनिटखालील वीजवापर असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील व सर्वसाधारण वर्गवारीतील ग्राहकांना अल्प दरात १ किलोवॅट सौर ऊर्जा संच मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे ग्राहकांना वीज बिलात होणारी बचत आणि अनुदानाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांच्या प्रत्येक अडचणीला प्राधान्य देऊन ती सोडवली जाईल, अशी ग्वाही महावितरणने उपस्थित ग्राहकांना दिली. हे ग्राहक समाधान शिबिर आता दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नंदुरबार मंडलातील सर्व उपविभागीय कार्यालयांत आयोजित केले जाणार असून, ग्राहकांना आपल्या तक्रारी व समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील, असे महावितरणने कळवले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: