‘चला शाळेत जाऊया’ अभियान; वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन घेणार विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा
शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘शिक्षण संवाद’ या एकदिवसीय कार्यशाळेचे मुंबईतील बालभवन येथे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह विभागातील सर्व संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिक्षण विभागाने प्रशासकीय कामकाजाबरोबरच विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि ग्रामस्थ यांच्याशी थेट संवाद साधावा. यासाठी राज्यातील आठही विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय जबाबदारी निश्चित करून प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेण्यात येणार आहे. हे अधिकारी चार दिवसांच्या विशेष दौऱ्यात शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यांकन करतील. ज्या शाळांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील त्या शाळांना विविध माध्यमांतून प्रोत्साहन दिले जाईल, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

