“संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे”, विनोदवीर ह.भ.प.नाना महाराज दोंडाईचेकर, यांच्या रसाळ कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध
कीर्तनाच्या प्रारंभी महाराजांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या “रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी” या अभंगाचे निरूपण करत विठ्ठलभक्तीचे महात्म्य उलगडून सांगितले. विठ्ठलाचे दर्शन हे केवळ डोळ्यांचे नसून अंतःकरणाच्या अनुभूतीचे दर्शन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक जन्मांच्या पुण्यसंचयातूनच विठ्ठलभक्तीची आवड निर्माण होते आणि विठ्ठलनामातच खरे समाधान व आनंद दडलेला असतो, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यानंतर संत नामदेव महाराजांच्या “संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे” या अभंगावर अत्यंत प्रभावी निरूपण केले. संतसंग हा जीवनातील सर्वात मोठा लाभ असून संतांच्या सहवासातून माणसाच्या विचारांमध्ये, आचरणामध्ये आणि जीवन दृष्टीमध्ये परिवर्तन घडते. संत हे समाजाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ असून त्यांच्या शिकवणुकीतून मानवतेचा खरा संदेश मिळतो, असे महाराजांनी सांगितले.
कीर्तनादरम्यान त्यांनी विविध दाखले, विनोदी प्रसंग, लोक जीवनातील अनुभव आणि संतवाङ्मयातील संदर्भ देत व्यसनमुक्ती, सदाचार, संतसंग, नामस्मरण, कुटुंब मूल्ये आणि मानवसेवेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या खास विनोदी शैलीमुळे उपस्थित भाविक अनेकदा खळखळून हसले, तर संतविचारांच्या गंभीर मांडणीमुळे अंतर्मुखही झाले. म्हणूनच खानदेशात त्यांना “विनोद सम्राट” आणि “विनोदवीर कीर्तनकार” म्हणून विशेष मान्यता प्राप्त आहे. यावेळी “जिसकी नैया राम भरोसे, डोल भले सकती है डूब नहीं सकती है” या लोकप्रिय भजनाच्या माध्यमातून त्यांनी श्रद्धा, विश्वास आणि ईश्वरनिष्ठेचा संदेश दिला. तसेच “हंसा निकल गया रे काया से” या भजनातून मानवी जीवनाचे क्षणभंगुर स्वरूप, मृत्यूचे अटळ सत्य आणि सत्कर्मांचे महत्त्व भावपूर्ण शब्दांत मांडले.
महाराजांनी भक्ती, विनोद आणि समाजप्रबोधन यांचा अप्रतिम संगम साधत उपस्थित भाविकांना हरिनामाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. कीर्तन संपल्यानंतर दीर्घकाळ हरिनामाचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. विशेष म्हणजे, या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे YouTube, Facebook आणि विविध सोशल मीडिया माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ शहादा परिसरातीलच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच इतर राज्यांतील असंख्य भाविक घरबसल्या कीर्तनाचा लाभ घेत आहेत. संतविचारांचा आणि हरिनामाचा संदेश डिजिटल माध्यमातून व्यापक स्तरावर पोहोचत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, महिला भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक भक्त उपस्थित होते. सप्ताहातील पुढील कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ममता हेमराज पवार, हेमराज पवार , प्रा.डॉ. अनिल साळुंके तसेच आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

