गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 19 लाख 18 रुपये किमतीचा 39 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
3 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहादा पोलीस ठाणे हद्दीतील सटीपाणी शिवारात मालनदेवी नाल्याजवळ एका इसमाने भुईमुंग पिकाच्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड करुन त्याची जोपासना करीत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा पोलीस ठाणे हद्दीतील मलगांव ते सटीपाणी शिवारातील मालनदेवी नाल्याजवळ एका भुईमुंगाच्या शेताची पाहणी केली असता तेथे भुईमुंग पिकाच्या आत 39 किलो 04 ग्रॅम वजनाचे 18 लाख 19 हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळुन आली. गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली.
तसेच बेकायदेशीररित्या गांजा सदृष्य झाडांची लागवड करुन संवर्धन व जोपासना करतांना आरोपी नामे ठाणसिंग हुंड्या ऊर्फ टुंड्या पावरा, रा. जामजिरा जालोद, पोस्ट तहऱ्हाड कसबे, ता. शिरपुर, जि. धुळे याचेविरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम -1985 चे कलम 8(c), 20(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, पोलीस हवालदार दत्तात्रय बागल, जितेंद्र पाडवी, स्वप्नील गोसावी, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार भरत उगले, शोएब शेख, विशाल मराठे, सतिष घुले यांच्या पथकाने केली.

