शिक्षणमंत्र्यांची मंत्रालयात बैठक: अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, रात्रशाळांचे वेतन आणि वैद्यकीय देयके मार्गी लावण्याच्या सूचना
मुंबईतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांपैकी १९९ शिक्षकांचे समायोजन अद्याप प्रलंबित आहे. या शिक्षकांची पात्रता तपासून त्यांचे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अथवा रात्रशाळांमध्ये तातडीने समायोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने एकत्रित काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विधानपरिषद सदस्य ज.मो.अभ्यंकर यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीस शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, संचालक (माध्यमिक) डॉ.महेश पालकर, संचालक (प्राथमिक) शरद गोसावी आदी बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी मुंबईतील रात्रशाळांमध्ये शिक्षकांची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्यास तपासून पाहावे, रात्रशाळांमधील दुबार शिक्षकांना त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या आधारे प्रलंबित असल्यास वेतन अदा करावे, शिक्षकांची वैद्यकीय देयके अनेक वर्षे प्रलंबित असल्यास त्यासाठी आवश्यक निकष लावून ती मार्गी लावावीत, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या संचित अर्जित रजेचे रोखीकरण करण्याबाबत आवश्यकतेनुसार नियमांमध्ये बदल करावेत, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

