नवी दिल्लीत रंगणार शिवविचारांचे विचारमंथन; जेएनयूमध्ये ‘जयिष्णू : सहिष्णू भारताचे रक्षक’ राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
छत्रपती शिवाजीमहाराज यांचे जीवनकार्य, प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांसंदर्भात विविध अंगांनी चर्चा करण्यासाठी ‘जयिष्णू : सहिष्णू भारताचे रक्षक’ या विषयावर २ व ३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत जेएनयूच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र होणार आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे केवळ युद्ध आणि पराक्रमाच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांची प्रशासन व्यवस्था, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, मराठा आरमार, संस्कृत साहित्यातील शिवरायांचे संदर्भ तसेच पुढील काळातील मराठ्यांचा दिल्लीवरील प्रभाव अशा विविध पैलूंवर चर्चासत्रात तज्ज्ञांकडून विचारमंथन केले जाणार आहे.

